“उमलते वय समजून घेताना” व्याख्यानमालेतील तिसरे सत्र यशस्वी संपन्न
“उमलते वय समजून घेताना” या व्याख्यानमालेतील पहिल्या दोन सत्रांना पालकांकडून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद लाभला. पालकांच्या या सकारात्मक प्रतिसादातून प्रेरणा घेऊन या व्याख्यानमालेतील तिसरे सत्र खास किशोरवयीन मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आले.
रविवार, ५ जुलै, रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या सत्रामध्ये इयत्ता ६ वी ते ९ वी मधील सुमारे २० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या सत्राचे मार्गदर्शन डॉ. वैशाली देशमुख यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय संवादात्मक पद्धतीने संवाद साधत विविध उपक्रम आणि कृतींच्या माध्यमातून किशोरवयात अनुभवास येणाऱ्या विविध भावनांची ओळख करून दिली. विशेषतः या वयात जाणवणाऱ्या रागाच्या भावनेवर नियंत्रण कसे ठेवावे, त्याची कारणे, परिणाम आणि त्यावर मात करण्याचे प्रभावी मार्ग त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांचे तीन गट करून प्रत्येक गटाला एक प्रसंग (Situation) देण्यात आला. त्या प्रसंगात त्यांच्या भावना काय असतील, ते कशी प्रतिक्रिया देतील आणि त्या परिस्थितीत त्यांची कृती काय असेल, हे छोट्या नाटिकेच्या (Play) माध्यमातून सादर करण्यास सांगण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रभावी नाटिका सादर केल्या. त्यानंतर डॉ. वैशाली देशमुख यांनी प्रत्येक गटाच्या सादरीकरणाचे विश्लेषण करून योग्य दृष्टिकोन, भावनांचे व्यवस्थापन आणि परिस्थितीला सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्याचे मार्ग विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
सुमारे अडीच तास चाललेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रश्नोत्तरांमध्ये तसेच विविध उपक्रमांमध्ये त्यांनी मनमोकळेपणाने सहभाग घेतला. एका प्रभावी कथेच्या माध्यमातून डॉ. देशमुख यांनी रागावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व अत्यंत सोप्या आणि परिणामकारक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या भावनांना समजून घेण्यास, त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यास प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या सचिव सौ. प्रणोती गर्गे यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


