भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणेच्या किशोरवयीन प्रकल्पांतर्गत ‘उमलते वय समजून घेताना’ या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात ‘GEN Z पिढी, स्क्रीन टाइम – परिणाम, आव्हाने आणि उपाय’ या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर सखोल चर्चा करण्यात आली.
संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्य डॉ जयश्री बंगाली यांनी उपस्थित किशोर वयीन पाल्यांच्या पालकांचे स्वागत केले व संस्थेच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली
मुख्य वक्त्या डॉ. वैशाली देशमुख यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. लहान मुलांना मोबाईलचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात आणि पालकांच्या देखरेखीखालीच करावा, असे त्यांनी सांगितले. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांचे विकार, मानदुखी, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा तसेच अंतर्गत अवयवांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.
समुपदेशक मयुरेश डंके यांनी किशोरवयीन मुलांच्या मोबाईल वापराबाबत पालकांनी समजूतदार भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. मोबाईल हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याचा वापर कसा आणि किती करायचा याचे भान असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांनी मैदानी खेळ, शारीरिक श्रम आणि कौटुंबिक संवाद यांना प्राधान्य दिल्यास स्क्रीन टाइम आपोआप कमी होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पालकांनी मुलांशी संवाद वाढवून संतुलित जीवनशैलीचा आग्रह धरावा, असा संदेश या व्याख्यानातून देण्यात आला. सह सचिव अनुजा सोनसळे यांनी सर्वांचे आभार मानले.



