भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘सरस्वती समाजसेवा पुरस्कार’ सोहळा शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या वर्षीचा हा पुरस्कार श्रीमती प्राजक्ता वढावकर (तपस संस्था) यांना अल्झायमर व डिमेन्शिया रुग्णांसाठी केलेल्या मोलाच्या समाजकार्याबद्दल प्रदान करण्यात आला.
गेल्या १० वर्षांपासून तपस संस्था डिमेन्शिया व अल्झायमरग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या या समर्पित सेवेची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
या सोहळ्यात श्रीमती विनया डोईफोडे (विनया चल वाचनालय) यांना फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढविल्याबद्दल ‘सरस्वती समाजसेवा गौरवपत्रा’ ने सन्मानित करण्यात आले. तसेच अंकिता इंगोले यांना एक कोटी रोपांची लागवड व संवर्धनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘सरस्वती समाजसेवा गौरवपत्रा’ ने गौरविण्यात आले.
कर्मचार्यांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देण्यासाठी प्रदान करण्यात येणारा ‘कार्यकुशल कर्मचारी’ हा पुरस्कार श्रीमती नम्रता राऊत व शीतल झरकर या संगणक शिक्षिकेंना देण्यात आला.
याच समारंभात संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती अनघा लवळेकर (संचालिका, JPIP) होत्या. आपल्या भाषणात त्यांनी भगिनी निवेदिता प्रतिष्ठान गेली ४५ वर्षे समाजात कार्यरत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले व या संस्थेशी जोडले जात असल्याचा आनंद व्यक्त केला.
त्यांनी ‘Capital I’ आणि ‘small i’ या संकल्पनेवर प्रकाश टाकत सांगितले की, अनेक ‘small i’ एकत्र आल्यावरच खरा ‘Capital I’ तयार होतो आणि अशा सामूहिक प्रयत्नांतूनच समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देता येते. यावेळी त्यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या संवादिनी समूह व भगिनी निवेदिता प्रतिष्ठान यांच्यात सहकार्य करण्याची इच्छाही व्यक्त केली.
समाजसेवेतील महिलांच्या कार्याचा सन्मान करणारा हा उपक्रम संस्थेतर्फे १९८२ पासून सातत्याने राबविण्यात येत आहे.
उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती मृदुला केळकर यांनी केले. संस्थेच्या उपक्रमांची माहिती सचिव प्रणोती गर्गे यांनी दिली तर संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल अध्यक्ष वंदना केळकर यांनी माहिती दिली. प्रणोती गर्गे यांनी सर्वांचे आभार मानले व यावर्षीचा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
